मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते
शाहूवाडी तालुक्यातील टेकोली येथील शेतकरी श्री. जालिंदर शामराव पाटील यांनी वन्यप्राण्यांकडून मका पिकाचे नुकसान झाल्याच्या संतापातून वनपरिक्षेत्र कार्यालय मलकापूर येथे मका पिकाचे ताटवे घेऊन आंदोलन केले होते. या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ दखल घेत नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून नुकसान भरपाई प्रक्रियेला सुरुवात केली आहे.दिनांक २० मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय मलकापूर (प्रा.) येथे टेकोली येथील शेतकरी जालिंदर पाटील यांनी वन्यप्राण्यांमुळे मका पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार मांडत संताप व्यक्त केला. यावेळी वनरक्षक पनुंद्रे गुरुबचन हिप्परकर यांनी त्यांची समजूत काढत माहिती घेतली.

शेतकरी जालिंदर पाटील यांनी सांगितले की, रानडुकरांकडून त्यांच्या मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.वनपरिक्षेत्र अधिकारी मलकापूर उज्वला मगदूम यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून अधिकृत पद्धतीने माहिती द्यावी, जेणेकरून नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांनी चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, तसेच शिकारी, अवैध वाहतूक किंवा जखमी वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.


