KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्याच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. गावातील शेतकरी कुमार कुंभार यांच्या पाळीव कुत्र्यावर शुक्रवारी (दि. 17 जुलै 2026) पहाटे बिबट्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच मलकापूर वन परिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल लोंढे व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तसेच मृत कुत्र्याच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांना बिबट्या व मानव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे, पाळीव जनावरे व कुत्रे सुरक्षित ठिकाणी बांधावेत, परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.वन विभागाने नागरिकांनी सतर्क राहून वन्यप्राण्यांच्या हालचालीबाबत त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन केले असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून पुढील उपाययोजनाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.


