हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत अतिक्रमणांविरोधातील कारवाई सध्या संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही मोजक्या भागांपुरतीच कारवाई मर्यादित राहिल्याचा आरोप होत असतानाच, एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याशी संबंधित अतिक्रमणाच्या प्रकरणाची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित RTI कार्यकर्त्याने अतिक्रमित जागेवरील गाळ्याचा व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहाराची रक्कम सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे अतिक्रमणांविरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या अतिक्रमणाबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मते, अतिक्रमण हटविण्याची कारवाई सर्वांसाठी समान असणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी कारवाई होत असताना संबंधित कार्यकर्त्याच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “कायद्याचा आग्रह धरणारेच नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यावर कारवाई कोण करणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यामुळे “कुंपणच शेत खात आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत असून, येत्या काळात या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
Kk news प्रतिनिधी सुलतान नदाफ



