गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर आतापर्यंत ५० टक्के आमदारांनी राज्यसभेसाठी मतदान केले आहे. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.
मात्र, हे मतदान सुरु असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय असावा, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असली तरी धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी मतांची जुळवाजुळव केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप राजकीय चमत्कार करून दाखवणार का, पाहावे लागेल.
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. ही मतमोजणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षा उशीरापर्यंत चालेल, असा अंदाज आहे. शिवसेना आणि भाजपकडून आपापले उमेदवार हे पहिल्या पसंतीच्या मतांवरच निवडून येतील, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.