मलकापूर (प्रतिनिधी) :
शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक, शाहुवाडी पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शाहुवाडी तालुका डोंगराळ व मागास भाग म्हणून ओळखला जात असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये दारू, जुगार, गुटखा, अवैध वाहतूक तसेच काही ठिकाणी सुरू असलेले इतर बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.तसेच, संबंधित विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर व तरुणांवर याचा विपरीत परिणाम होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून तालुका स्वच्छ व सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष मा. बाळासाहेब कदम यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी उपस्थित सतीश तांदळे व मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी.


