Home Uncategorized वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात मनसेचे लक्षवेधी आंदोलन

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात मनसेचे लक्षवेधी आंदोलन

4 second read
0
0
169

मलकापूर प्रतिनिधी:

वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानवासह जनावरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यात वन विभागावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गवा, बिबट्या व अन्य वन्य प्राण्यांचे वेष परिधान करून लक्षवेधी आंदोलन केले.

मोर्चादरम्यान दिलेल्या निवेदनात हिंस्र वन्य प्राण्यांकडून होणारे रक्तरंजित हल्ले, पिकांचे होणारे प्रचंड नुकसान तसेच या हल्ल्यांत बाधित कुटुंबांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. आजपर्यंत अनेक ठिकाणी बिबट्यांकडून शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले झाले असून, रानटी गव्यांच्या हल्ल्यात दुबत्या जनावरांसह मनुष्यहानीही झाली आहे. मात्र अशा घटनांनंतर प्रशासनाकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.यावेळी संपूर्ण जंगलाला दर्जेदार कंपाउंडिंग करावे, जंगलातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेरे बसवावेत, तसेच बाधित नागरिकांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन वन विभागाला देण्यात आले.

यावेळी बोलताना मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे यांनी सांगितले की, संपूर्ण तालुका भीतीच्या छायेत असून वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा मनसेच्या शैलीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, परिक्षेत्र वन अधिकारी उज्वला मुगदूम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच मानवी वस्तीत होणारा वन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.या आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे, संजय पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांनी परिधान केलेले वन्य प्राण्यांचे वेष तालुक्यात चर्चेचा विषय ठरले.

यावेळी तालुका सचिव सतीश तांदळे, सचिन कांबळे, कुणाल काळे, मधुकर पाटील, संजय पाटील, धनाजी गुरव, निलेश मोरे, संदीप लाळे, नयन गायकवाड, संजय कदम, सुषमा सुंबे यांच्यासह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…