Home Uncategorized अंकली – चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

अंकली – चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार ; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश

4 second read
0
0
29

जयसिंगपूर : प्रतिनिधी

रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले असून, बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री यांनी चौपट दराच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे.

रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती. या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता. मात्र अंकली ते चोकाक या सुमारे ३३ किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याने शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने करून महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय आहे. त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत अखेर चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली. त्यामुळे या ३३ किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शेतीच्या नुकसानाची योग्य भरपाई मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे. याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

🔴 चौकट

शेतकऱ्यांना ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ

रत्नागिरी–नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या ३३ किमी टप्प्यासाठी बाधित शेतकऱ्यांना अखेर चौपट दराने नुकसान भरपाई मिळणार आहे. या भागात ९३७ खातेदार असून, दुप्पट दराने केवळ ९४ कोटी रुपये मिळणार होते. मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने चौपट दरास मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना एकूण १७१ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…