Home Uncategorized कुंभोजमध्ये ८० वर्षांनंतर बाजारपेठेचा ऐतिहासिक प्रश्न मार्गी

कुंभोजमध्ये ८० वर्षांनंतर बाजारपेठेचा ऐतिहासिक प्रश्न मार्गी

4 second read
0
0
100

कुंभोज (ता. हातकणंगले) :
कुंभोज गावातील तब्बल ८० वर्षांपासून प्रलंबित असलेला बाजारपेठेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष ग्रामसभेत गट क्रमांक १९५९ मधील १ हेक्टर २० आर शासकीय जमीन मुस्लिम समाजाला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. परिणामी गट क्रमांक १९०३ मधील बाजार भरवण्याचा वाद संपुष्टात येऊन गावात ऐतिहासिक निर्णय घडला आहे. या निर्णयामुळे बाजारपेठेचे स्वप्न पूर्ण झाले असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

विशेष ग्रामसभेत जवळपास दीड तास चर्चा झाली. ठरावाच्या समर्थनासोबतच विरोधाचाही सूर उमटला. काही ग्रामस्थांनी सदर जमीन मुस्लिम समाजाला देण्याचा विरोध नोंदवला; तर बहुसंख्य ग्रामस्थांनी गावाच्या एकीच्या दृष्टीने व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मत मांडले. शेवटी बहुमताने ठराव मंजूर झाला. सभेसाठी २१४ हून अधिक ग्रामस्थ उपस्थित असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री महापुरे होत्या.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी गट क्रमांक १९०३ मध्ये बाजार भरवण्याच्या मागणीसाठी तब्बल पाच दिवस आमरण उपोषण केले होते. त्यांच्या या आंदोलनामुळेच ग्रामपंचायत, प्रशासकीय अधिकारी, गटनेते आणि मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली. त्यातून गट क्रमांक १९५९ मधील जागा मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर १९०३ मधील बाजारपेठेचा प्रश्न सुटला आणि ग्रामस्थांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली. परिणामी उपोषणाला यश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामसभेत काही ग्रामस्थांनी ठरावाला विरोध दर्शवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व सामाजिक एकात्मतेसाठी निर्णय होणे गरजेचे असल्याने बहुमताने ठराव संमत करण्यात आला. त्यामुळे सभेतील तणाव शमला आणि सर्व समाजातील नागरिकांचा सहभाग असलेला हा ऐतिहासिक निर्णय नोंदवला गेला.

या वेळी उपसरपंच आप्पासाहेब पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, किरण नामे, बाळासाहेब ढोणे, रावसाहेब तोरस्कर तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

८० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बाजारपेठेचा प्रश्न सुटल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक १९०३ मधील बाजारपेठ विकसित झाल्यास गावाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असून व्यापारिक संधी वाढतील. त्यामुळे कुंभोज गाव राज्यातील एक महत्त्वाची व ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून उदयास येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

या निर्णयासाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराबरोबरच ग्रामस्थांच्या एकजुटीचे मोठे योगदान असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. हातकणंगले पोलिसांनी या संपूर्ण ग्रामसभेदरम्यान कडक बंदोबस्त ठेवून शिस्त राखली.
के के न्यूज, हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…