
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली, तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे. कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो, शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. नागरिकांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे आवश्यक असून, त्या दृष्टीने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, उदगाव येथील साकारण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय, तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय याच्या माध्यमातून आरोग्य विभाग सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते. या कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार यड्रावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दतवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून, उदगाव येथील उपजिल्हा रुग्णालय व मनोरुग्णालयाला मंजुरी मिळाली असून त्याचे कामही सुरू आहे. यापुढेही आरोग्य सेवेत भर घालणारी कामे हाती घेतली जातील. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातर्फे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
या प्रसंगी अमरसिंह पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, डॉ. कुमार कदम, डॉ. रश्मी जाधवर, डॉ. अनिल कामटे, डॉ. भूषणकुमार यमाटे, डॉ. आशिष कदम, डॉ. नितीन ढोणे यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.