जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. उदगाव येथील क्षयरोग रुग्णालयाच्या जागेत ३० खाटांच्या नवीन आयुष रुग्णालयाची मंजुरी मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्यासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून तालुक्यातील नागरिकांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग, पंचकर्म व निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धती मोफत उपलब्ध होणार आहेत.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याला उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणारा ‘मेडिकल हब’ बनवण्याचा संकल्प केला होता. त्याच्या पूर्ततेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. याआधी उदगाव येथे ग्रामीण रुग्णालय तसेच मंजूर झालेले मनोरुग्णालय ही मोठी पावले होती. आता आयुष रुग्णालयाच्या स्थापनेसाठी मान्यता मिळाल्याने तालुका आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षम बनत आहे.
शासकीय आयुष रुग्णालय सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, पंचकर्म आणि निसर्गोपचार यांसारख्या उपचारांची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे केवळ आधुनिक औषधांवर अवलंबून न राहता पारंपरिक आणि नैसर्गिक उपचारांची सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील जनतेला मिळणार आहे. आयुष रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक व्यापक होणार आहे. येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि नैसर्गिक उपचारांसाठी पंचकर्म, योग थेरपी, नैसर्गिक उपचार, तसेच होमिओपॅथी आणि युनानी पद्धतींची सुविधा असेल. यामुळे जीवनशैलीशी संबंधित विकार, संधिवात, पचनाचे आजार, त्वचेच्या तक्रारी आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्यांवर अधिक प्रभावी उपाय उपलब्ध होणार आहेत.
सर्वसामान्य नागरिकांसाठी हे रुग्णालय वरदान ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आयुष उपचार सहज उपलब्ध होतील. तसेच, पंचकर्म आणि योग थेरपी यांसारख्या उपचारपद्धतीमुळे अनेक जुनाट आणि जटिल आजारांवर उपचार मिळणार आहेत
लवकरच या रुग्णालयाच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल आणि त्यानंतर तत्काळ बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.
सध्या औषधोपचारासाठी नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागते, मात्र शासकीय आयुष रुग्णालयाच्या स्थापनेमुळे त्यांची गैरसोय दूर होईल. आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि निसर्गोपचार यांसारख्या उपचारपद्धतींचा अधिकाधिक प्रचार व प्रसार होणार आहे. सदरचे रुग्णालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आमदार यड्रावकर यांनी आभार मानले आहेत.