
कागल प्रतिनिधी ओंकार पोतदार
मुरगूड ता. कागल येथील “नामदार चषक” राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शुभम सिद्धनाळे याने गणेश कुरकुमे याला नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. 52 किलो गटात अतिशय चुरशीच्या सामन्यात बेलेच्या माऊली टिपूगडे याने राशिवडेच्या किशोर पाटील याला आपल्या आक्रमक खेळीने पराभूत करत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचा दुसरा दिवस बाल कुस्तीगीरांनी गाजवला. विजेच्या चपळाईने डाव प्रति डाव करत आपल्या कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन बालमल्लांनी घडवले.
संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कुस्ती केंद्रातील नामवंत स्पर्धक स्पर्धेसाठी आले आहेत. प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील मल्लांचा मोठा सहभाग या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. ग्रामीण भागातील आखाड्यातील खेळाडूंना आपले कुस्ती कौशल्य दाखवण्याची संधी स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली आहे.
नामदार चषक राज्यस्तरीय मॅटवरील कुस्तीच्या स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवशी कुस्ती शौकिनांना 45 किलो,52 किलो, 46 किलो वजनी गटातील अतिशय वेगवान आणि चटकदार कुस्त्या पहावयास मिळाल्या.
चित्त्याच्या चपळाई, शह ,काटशह,खेळातील आधुनिक तंत्र आणि जल्लोषात मुरगूडचे कुस्ती मैदान व्यापून राहिले.
कुमार गटातील विविध वजनी गटामध्ये रविराज पाटील बानगे, सोहन चौगले इचलकरंजी, संग्राम करडे, संस्कार माने नदीकिनारा, शिवानंद मगदूम सिद्नेर्ली, राजवर्धन पाटील नावली, ओम माळी हुपरी, ऋग्वेद मगदूम चुये, स्वराज्य कदम पाचगाव, वेदांत पाटील सिद्धनेर्ली,
52 किलो वजनी गटात धीरज डाफळे पिंपळगाव, सचिन चौगुले पुणे, श्रीकांत भोसले, साईराज बकरे, हर्षवर्धन माळी म्हाकवे, महेश पाटील, समर्थ माळी, हुपरी,अर्जुन गुडाळकर पुणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपापले सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.
खुल्या गटातील कुस्ती स्पर्धेत कुस्ती ग्रीको रोमन विभागातील महाराष्ट्र केसरी विजेता शुभम सिद्धनाळे कुस्ती शौकिनांचे प्रमुख आकर्षण ठरला. शुभमने “हिंदू गर्जना केसरी” स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पराभूत केले होते. या स्पर्धेत थार गाडी आणि अडीच लाखाचे पारितोषिक शुभमने पटकावले.
खुल्या गटातील एकच सामना स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झाला.शुभम सिद्धनाळे व गणेश कुरकुमे यांच्यात सामना झाला. या सामन्यात पहिल्या क्षणापासून दोन्हीही हाफ मध्ये शुभमने वर्चस्व ठेवले शुभमच्या मानाने कमी अनुभव असणाऱ्या गणेश कुरकुमे याने चांगली लढत दिली. ही लढत शुभम याने 3 विरुद्ध 0 गुणांवर जिंकली. स्पर्धेच्या पुढील कालावधीत शुभम हा स्पर्धेतील हॉटस्पॉट ठरेल अशी शक्यता आहे.
स्पर्धा पाहण्यासाठी गोकुळचे संचालक रणजीतसिंह पाटील मुदाळ उपस्थित होते. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेते कुस्ती कोच राम सारंग यांचा मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला.
मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती काळुगडे, वस्ताद अण्णा गोधडे, राजाराम गोधडे दिगंबर परीट रणजीत सूर्यवंशी, डॉ.सुनील चौगले, सचिन मगदूम, युवराज सूर्यवंशी,सत्यजित चौगले, अमित तोरसे,नंदकुमार खराडे, उपस्थित होते
स्पर्धेसाठी पंच संदीप पाटील, बाबा शिरगावकर ,आनंदा गोडसे ,आकाश नलवडे ,वैभव तेली ,महेश पाटील , पांडूरंग पुजारी यांनी काम पाहिले.राजाराम चौगले व बटू जाधव यांनी समालोचन केले.