Home Uncategorized कुरुंदवाड–नांदणी मार्गासाठी ६ कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

कुरुंदवाड–नांदणी मार्गासाठी ६ कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

3 second read
0
0
25

जयसिंगपूर : कुणाल कांबळे
कुरुंदवाड–नांदणी या महत्त्वाच्या दळणवळण मार्गासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे या मार्गाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य मार्ग १५३ ते कुरुंदवाड–नांदणी राज्यमार्ग १६६ व (प्रमुख जिल्हा मार्ग ७३) या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

या मंजूर निधीतून प्रामुख्याने कुरुंदवाड–नांदणी मार्गावरील काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाली होती. दरवर्षी महापुराचा मोठा फटका या रस्त्याला बसत असल्याने वारंवार रस्त्याचे नुकसान होत होते. पावसाळ्यात व पुराच्या काळात अनेक वेळा हा मार्ग पाण्याखाली जात असल्याने वाहतूक ठप्प होत होती. परिणामी नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
नांदणी हे गाव भाजीपाला उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील अनेक शेतकरी भाजीपाला वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. खराब रस्त्यामुळे वेळेवर बाजारपेठेत माल पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते.

तसेच कुरुंदवाड–नांदणी हा मार्ग कोल्हापूरकडे जाण्यासाठी अनेक वाहनधारक पर्यायी मार्ग म्हणून वापरत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे या रस्त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, त्यामुळे या मार्गासाठी ६ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. निधी मंजूर झाल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हा मार्ग अधिक सुरक्षित व मजबूत होणार असून, पुराच्या काळातही वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे दळणवळण सुलभ होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…