Home Uncategorized शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाही..

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाही..

5 second read
0
0
4

कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण क्षेत्रात व्यापक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न राहील. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करणे, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांचे अस्तित्व टिकविणे आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणे, यासाठी ठोस कृती कार्यक्रम हाती घेणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दिली.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर प्रथमच दिवाळीनिमित्त हॉटेल अयोध्या येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी सहा वर्षांच्या कार्यकाळातील शैक्षणिक विकासाचा दृष्टिकोन, शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि भविष्यातील प्राधान्यक्रम स्पष्ट केले.

आमदार कौस्तुभ गावडे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थानात अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शिक्षणासाठी स्वतःची संपत्ती खर्च करून सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. त्यांचा शैक्षणिक विचार आणि पुरोगामी वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. डोंगर-दऱ्यांत, वाड्या-वस्त्यांमध्ये शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या मराठी शाळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनासह सविस्तर चर्चा केली आहे. राज्यातील सुमारे २६ हजार शिक्षकांच्या पेन्शन प्रश्नावर पर्यायी सूत्र तयार करण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील. यासाठी तीन दिवसांच्या सविस्तर बैठकींचे नियोजन करण्यात येणार आहे.
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार कमी करणे ही प्रमुख प्राथमिकता असेल. शैक्षणिक कामात शिक्षकांचा अधिकाधिक वेळ खर्च व्हावा, यासाठी अशैक्षणिक जबाबदाऱ्या बेरोजगार तरुणांकडे सोपवून त्यातून रोजगारनिर्मिती करण्याची संकल्पना पुढे नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे नमूद करून आमदार गावडे म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यात रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करणे आणि संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देणे यावर विशेष भर दिला जाईल. पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
शिक्षण संस्थांचे प्रलंबित प्रश्न, क्रीडा अनुदान आणि वेतनेतर अनुदान मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जाईल. तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच त्यांच्या अनुभवाला योग्य मान्यता मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतली जाईल.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देत शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांच्यात समन्वय साधून शैक्षणिक विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अजिंक्य पत्रावळे, श्री विशाल प्रित्यानी, श्री. शुभम निंबाळकर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हातकणंगले नगरपंचायतीत नगरसेवक सुभाष गोरे यांचे ठिय्या आंदोलन..

हातकणंगले नगरपंचायतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्…