रोहित पास्ते:
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील श्रीमरीमाई देवी यात्रा 2025 या वर्षी 12 मेपासून 21 मेपर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. श्रीमरीमाई यात्रा कमिटी मलकापूर यांच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात 12 मे रोजी देवीची परडी मिरवणूक आणि प्रतिष्ठापनेने होणार आहे. 13 मे रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र नरसिंह मंदिर मलकापूर यांच्या वतीने दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन व कीर्तन सेवा होणार आहे.14 मे रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून सुभाष चौक येथे स्वादिष्ट खाद्य महोत्सव व संगीत मैफिल आयोजित केली आहे.

15 मे रोजी महिलांसाठी “आपला होम मिनिस्टर” नावाच्या विशेष कार्यक्रमात विविध खेळ, शालू-पैठणी व नथनी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.17 मे रोजी श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे थरारक बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ₹21,001 ठेवण्यात आले आहे. 18 मे रोजी रात्री 9 वाजता मुंबईहून आलेल्या सुपरस्टार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगणार आहे.19 मे रोजी श्री विठ्ठल भजनी मंडळ मलकापूर यांचा भजनाचा कार्यक्रम मरीमाई मंदिरात होणार आहे.

20 मे रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसाद व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेची सांगता 21 मे रोजी भव्य जंगी कुस्ती स्पर्धेने होणार असून, ती देखील श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दुपारी तीन वाजता रंगणार आहे.संपूर्ण यात्रा काळात गावात भक्तीभाव, सांस्कृतिक रंग आणि उत्सवाचा जल्लोष अनुभवण्यास मिळणार आहे. यात्रा कमिटी अध्यक्ष भारत गांधी यांनी पंचक्रोशीतील जनतेला यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमरीमाई यात्रा कमिटी मलकापूर सज्ज झाली आहे.



