
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. महिलांसाठी खास आयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर रात्रीच्या सत्रात झालेल्या कवालीच्या मैफिलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही सहभागी होऊन वातावरण अधिक रंगतदार केले. शनिवारी महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध मनोरंजक खेळ, पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी यामध्ये आनंदाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. रात्रीच्या सत्रात कवालीची भव्य मैफिल रंगली. यामध्ये प्रसिद्ध कवाल राजू नदाफ यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आपल्या आवाजाने कार्यक्रमात रंग भरला. त्यांचे गाणे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. या मैफिलीला माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

दुसऱ्या दिवशी आयोजित पशुपक्षी प्रदर्शनात तब्बल ९५ हून अधिक पशुपक्षी दाखल झाले होते. यामध्ये अडीच टन वजनाचा रेडा, चायनीज बोकड, नाचणारा घोडा, जातिवंत खिलार बैल आणि उच्च दर्जाच्या म्हशींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. अनेक शेतकरी आणि प्राणीप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन दुर्मिळ प्राण्यांची माहिती घेतली..शासकीय माहितीपर स्टॉल्सला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यासोबतच १६ फूट लांबीचा ऊस, केळीची विविध जाती, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणारी पिके, तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरले. यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला उपस्थित राहिले आणि शेतीतील नव्या संधींवर चर्चा केली.

आज सोमवारी सकाळी ९ वाजता भव्य डॉग आणि कॅट शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये विविध देशी आणि विदेशी जातींचे श्वान व मांजरींचे प्रदर्शन होणार आहे. प्राणीप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
सायंकाळी शरद कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, प्राण्यांचे प्रदर्शन आणि आधुनिक कृषी माहितीमुळे शरद कृषी प्रदर्शन यशस्वी ठरत आहे.


