गुलाल-खोबऱ्याची उधळण : भैरेश्वराच्या नावानं चांगभलचा गजर
शिरटी ता. शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा रविवार दि. २८ एप्रिलपासून सुरू आहे. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ९ वाजता श्रींची पालखी व भव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थिती धनगरी ढोलांच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली. श्री भैरेश्वराच्या पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करून भाविकांनी भक्तीभावाने श्रींचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांसह अन्य भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भैरेश्वराच्या मंदिरासमोर पालखीची फेरी काढून पालखी हाळभैरीकडे नेऊन पूजा करण्यात आली. परत पालखी गावाकडे येऊन हनुमान मंदिरास फेरी काढून भैरेश्वर मंदिराकडे रवाना झाली. पालखी सोहळ्यासाठी श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते. पालखी सोहळ्यादरम्यान अनेक भाविकांनी उदार मनाने देणगी दिली. यात्रा कमिटीच्या वतीने भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या भाविक-भक्तांचे आभार मानण्यात आले.
सोमवारी रात्री ऑर्केस्ट्रा वैभव हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवारी यात्रेच्या निमित्ताने सकाळी ९ वाजत बैल हातात धरून पळणे,रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा, लुना शर्यत, तसेच सायंकाळी ४ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. तसेच भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. यात्रेचा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष निखिल पाटील, उपाध्यक्ष संग्राम शिंदे, कार्याध्यक्ष अमोल सुतार, अक्षय शिरगावे, अमोल उदगावे, कुलदीप बनीजवाडे, प्रीतम चौगुले, यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच हसीना मुल्लानी, उपसरपंच प्रकाश माळी, ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी, सतीश चौगुले, प्रमोद उदगावे, राजकुमार शिरगावे, यासह अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.