ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कापड बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे,चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात,असे आवाहन सपोनि रविराज फडणीस यांनी केले.
टाकळीवाडी ता.शिरोळ येथील गुरुदत्त साखर कारखान्यांला ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रमप्रसंगी सपोनि फडणीस बोलत होते.उपनिरीक्षक सागर पवार,कार्यकारी संचालक राहुल घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पोलीस स्थापना दिवस अभियान 2024″ हे राबविण्यात येत आहे.रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.गुरुदत्त कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि बैलगाडी ऊस वाहतूक एक्का गाडीला रिफ्लेकटर वाटप करण्यात आले.
यावेळी अरुण चव्हाण,शहाजी फोंडे,फारूक जमादार,शिरीष कांबळे, आदी उपस्थित होते.