शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘शिक्षकांचा शिक्षकदूत’ निर्माण करण्याची गरज असून, मंगेश चिवटे हे त्यासाठी सक्षम पर्याय आहेत. आरोग्य क्षेत्रातील सामान्यांच्या प्रश्नांसाठी चिवटे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना माने म्हणाले, एखादे काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय चिवटे स्वस्थ बसत नाहीत. रात्री-अपरात्रीही सामान्य नागरिकांचे फोन उचलून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातील प्रश्नांप्रमाणेच शिक्षकांचे प्रश्नही ते ताकदीने मांडतील. शिक्षकांना विधानपरिषदेत आपला हक्काचा आवाज हवा असून, त्यासाठी मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाला संधी मिळावी, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा तसेच शिक्षक मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार माने बोलत होते.
स्वागत बापूसाहेब अडसूळ यांनी तर प्रास्ताविक पै. नितिन पाटील यांनी केले. यावेळी खासदार माने पुढे म्हणाले, मंगेश चिवटे यांनी कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या कर्तृत्व, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर सामान्यांसाठी काम केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री किंवा शिक्षक मंत्र्यांपर्यंत कोणतीही पूर्वनियोजित वेळ न घेता थेट जाऊन प्रश्न मांडण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला असून, आता शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांची गरज आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रभावी प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. शिक्षकांचा आमदार हा केवळ पदासाठी नव्हे, तर प्रश्न सोडविण्यासाठी झटणारा असावा. मंगेश चिवटे यांच्यात सामान्य कार्यकर्त्याची तळमळ आणि प्रश्न सोडविण्याची धडपड आहे. आगामी काळात त्यांच्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्न करणार असून, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम नेतृत्व उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षकांची सेवा-सुरक्षितता तसेच मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने यावर आगामी काळात गांभीर्याने काम करावे लागेल. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर मराठी शाळा टिकविण्यासाठी दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शाळांमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही यांसारख्या सुरक्षितता सुविधा देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन सोडविण्यासाठी सक्षम प्रतिनिधित्व आवश्यक आहे. मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याप्रमाणेच शिक्षकांच्या प्रश्नांसाठीही तळमळीने काम करतील. मंगेश चिवटे यांच्या पाठीशी शाहू आघाडीची ताकद उभी राहील आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी भूमिका यड्रावकर यांनी व्यक्त केली.
मंगेश चिवटे म्हणाले, पुणे शिक्षक मतदारसंघासह राज्यातील पाच शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध आंदोलने, उपोषणे आणि बैठकींमध्ये सक्रियपणे सहभागी होत शासनाकडे प्रश्न मांडले आहेत. जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदानवाढ यासह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आजपर्यंत शिक्षकांचे प्रश्न मांडताना कोणताही मोबदला न घेता काम केले असून, यापुढेही पारदर्शक, मोफत आणि निस्वार्थी पद्धतीने शिक्षकांच्या सेवेसाठी काम करण्याचा संकल्प आहे. शिक्षकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी ‘शिक्षक आरोग्य कवच योजना’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्नही प्राधान्याने हाताळला जाईल. विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षकांनी मला प्रतिनिधित्वाची संधी द्यावी. विधिमंडळात गेल्यानंतर २४ तास शिक्षकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणार आहे, असे चिवटे यांनी सांगितले. यावेळी वैभव शेटे, सुरेश शहापूरे, महेश चिवटे यांची मनोगते झाली.
या प्रसंगी जयसिंगपूर चे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, महेश चिवटे, मंदाकिनी चिवटे, प्रशांत साळुंखे, उदय झुटाळ, अर्चना भोजणे, सचिन डोंगरे, पंचायत समितीचे सदस्य प्रवीण देसाई, दीप्ती जाधव, मोहम्मदशफी पाटील, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, सुरेश शहापुरे, बजरंग खामकर, अशोक मळगे, पराग पाटील, विजीतसिंह शिंदे, महावीर पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा सह परिसरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



