हिंगणगाव : लोकनियुक्त प्रथम सरपंच दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंटी पाटील युवा शक्ती व स्वाभिमानी आघाडीच्या वतीने हिंगणगाव येथे सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या विकासकामांमध्ये प्रतिमा ते अण्णा नरदे सिमेंट रस्ता, सौदागर घर ते गावडे घर तसेच जैन वस्ती, तांडा वस्ती येथे गटर्स आणि अष्टेकर घर ते जैन वस्ती मराठी शाळेपर्यंत सिमेंट रस्ता आदी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे गावातील रस्ते व मूलभूत सुविधांना चालना मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार अशोकरावजी माने यांनी हिंगणगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास हिंगणगावचे माजी सरपंच व स्वाभिमानी आघाडीचे गटनेते संजय देसाई, माजी सरपंच विलास कांबळे, युवा नेते धनंजय टारे, मोहनलाल माळी, पंचायत समिती सदस्य गौरी मिसाळ, अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामांचे लोकार्पण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी आमदार अशोकरावजी माने यांचे आभार मानत गावाच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
केके न्यूज हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे



