
कोल्हापूर शहरातील सायबर चौक ते एनसीसी भवन दरम्यानच्या द्रुतगती मार्गावर काल मध्यरात्री मोठी दुर्घटना टळली. वरुटे हॉस्पिटलकडून शिवाजी विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका अज्ञात ट्रकने हाय-होल्टेज वीजवाहिनीला धडक दिल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर कोसळल्या. यामध्ये एक जाड वीजवाहिनी थेट रस्त्यावर पडली होती, तर दुसरी वायर अर्धवट अवस्थेत धोकादायकरीत्या लोंबकळत होती. तसेच वीजेचा खांबही पूर्णपणे वाकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याचवेळी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल शांतीनाथ बोटे आणि विकास चव्हाण हे रात्रीची पेट्रोलिंग ड्युटी बजावत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखले आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वाहतूक तातडीने दुसऱ्या मार्गाने वळवली. मध्यरात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
सुमारे एक ते दीड तास दोन्ही पोलिस कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून उभे राहिले. त्यांनी नागरिकांना सावध करत वाहतूक नियंत्रणात ठेवली. त्याचबरोबर महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांनाही तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तुटलेल्या वीजवाहिन्या सुरक्षितपणे हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिस कॉन्स्टेबल शांतीनाथ बोटे आणि विकास चव्हाण यांनी दाखवलेल्या तत्परता, जबाबदारी आणि धाडसामुळे मध्यरात्री मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी – समीर मकानदार




