Home Uncategorized आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

4 second read
0
0
15

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील आपटी येथे भव्य भजन महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून पन्हाळा तालुक्याची समृद्ध वारकरी परंपरा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकाराने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्ञानोबारायांचे विचार, साहित्य आणि महान जीवनकार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपटी येथे आयोजित कार्यक्रमाला पन्हाळा तालुका भाजप अध्यक्ष अमरसिंह भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पन्हाळा पंचायत समिती सदस्या सौ. मनीषा विश्वासराव पाटील, अंबवडे व मिठारवाडी गावच्या सरपंच यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राज्यगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गुरुमाऊली भजनी मंडळ आणि विठू माऊली भजनी मंडळ यांच्या सहकार्याने भजन महोत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अमरसिंह भोसले म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेले विचार केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून मानवता, समता, निसर्ग, ज्ञान आणि विवेकाचा व्यापक संदेश देणारे आहेत. ज्ञानोबारायांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच त्यांचे साहित्य, तत्त्वज्ञान आणि विचार अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत, या उदात्त उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. ज्ञानोबारायांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात पोहोचून ज्ञान, समता आणि मानवतेच्या संदेशातून सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी, हीच ‘ज्ञान माऊली’ उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ तसेच ‘संजीवन समाधी सोहळा’ या विषयांवरील नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.आशिष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन अंबवडेचे माजी सरपंच श्री. धनाजी गुरव यांनी केले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील वारकरी, ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या सदस्या, तरुण मंडळी तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या भजन महोत्सवामुळे आपटी परिसरात वारकरी परंपरेचा आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा जागर झाला.

पन्हाळा प्रतिनिधी- सचिन वरेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

महालक्ष्मी यात्रा कमिटी धरणगुत्ती आणि ग्रामपंचायत धरणगुत्ती यांच्या वतीने आयोजित करण्यात आ…