महालक्ष्मी यात्रा कमिटी धरणगुत्ती आणि ग्रामपंचायत धरणगुत्ती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शन आणि ऊस पिक स्पर्धेत शिरटी येथील प्रगतशील शेतकरी अशोक आप्पासो चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळी त्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
अशोक चौगुले यांनी जुलै २०२५ मध्ये ८६०३२ या सुधारित उसाच्या जातीची लागवड केली आहे. केवळ १३ ते १४ महिन्यात ३८ ते ४० कांड्यांचा हा ऊस आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करीत ठिबक सिंचन, योग्य बियाणे प्रक्रिया आणि सेंद्रिय व रासायनिक खतांचे संतुलित वापर करून ऊस पिकाची काळजी घेतली आहे.
या यशाबद्दल बोलताना चौगुले म्हणाले, माता आणि माती यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. काळी माती आपली माता असून ती जन्मभर आपले पालन पोषण करते. त्यामुळे तिच्याप्रती नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. हा पुरस्कार माझ्या प्रामाणिकपणाचे आणि कष्टाचे फळ आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक महेंद्र बागी, दरगु गावडे, शेखर पाटील, प्रमोद पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना तसेच महालक्ष्मी यात्रा कमिटी धरणगुत्ती चे सर्व पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
केके न्यूजसाठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे.



