
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि कोडोली व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी यांनी “तणावमुक्त व्यापार – समृद्ध भारताचा आधार” या विषयावर मार्गदर्शन केले. व्यापार करताना मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असून, ही एकाग्रता साधण्यासाठी राजयोग ध्यान प्रभावी ठरते, असे त्यांनी सांगितले. तसेच यशस्वी व्यापारी जीवनासाठी ग्राहक, समाज आणि संबंधित सर्व घटक समाधानी असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले
यावेळी ब्रह्माकुमार विलास भाईजी यांनीही आपल्या अनुभवातून राजयोग ध्यानामुळे व्यापारात तणावमुक्त जीवन कसे जगता येते, याबाबत मार्गदर्शन केले.
कोडोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि उपाध्यक्ष सुरज शहा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, व्यापारी वर्गासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्यास ब्रह्माकुमारी शमा बहनजी, संतोषी बहनजी, प्रतिभा बहनजी, तेजस्विनी बहनजी यांच्यासह उद्धव पाटील, धनाजी किबिले, डॉ. अशोक बंडगर, आर.आर. पाटील तसेच व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केके न्युज साठी प्रतिनिधी सनी काळे


