ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी व आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत खरेदी करताना ते सक्षम व्हावेत, यासाठी विविध ग्राहक संघटना समाजात जागृतीचे कार्य करीत आहेत. या दृष्टीने २४ डिसेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून तो जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन शाहूवाडीचे नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांनी केले.ते शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरवठा अधिकारी भारती भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

प्रदीप जाधव पुढे म्हणाले की, ग्राहक म्हणून आपल्याला विविध अधिकार देण्यात आले असून त्यातील महत्त्वाचे हक्क समजून घेणे ही काळाची गरज आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये व त्यांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आहे. बिंदू माधव जोशी यांच्या संकल्पनेतून ग्राहक चळवळीचा पाया घालण्यात आला असून त्यांनी ग्राहकांच्या न्यायहक्कासाठी संघटनांची स्थापना केली.

त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रणेते मानले जातात. या कायद्यानुसार जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ग्राहक न्याय मागू शकतो; मात्र त्यासाठी ग्राहकांनी सजग व जागरूक राहणे आवश्यक आहे.ग्राहकांना मूलभूत गरजांचा योग्य पुरवठा, माहिती मिळवण्याचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार तसेच निवडीचा व मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अमर पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार जामदार, कृषी अधिकारी ओंकार पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याची सखोल व सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अमर पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका उपाध्यक्ष नंदकुमार जामदार, कृषी अधिकारी ओंकार पवार, लक्ष्मण पाटील, वसंत पाटील, पत्रकार रमेश डोंगरे, सहाय्यक महसूल अधिकारी संदेश कदम, सीमा कोळी, श्वेता शेमडे, लिपिक अक्षय लुगडे, प्रेमकुमार सावळे, आकाश महाजन, बबन भोसले, दिग्विजय देसाई यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुरवठा अधिकारी भारती भोसले यांनी केले.



