
शिरोळ : प्रतिनिधी
कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष तारळे, उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिवपदी उमेश माळगे तर कार्याध्यक्षपदी संदीप अडसूळ यांची एकमताने निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार बाबासाहेब मोरे होते. सभेची सुरुवात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली. यानंतर सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची नावे सुचविण्यात आली. कोणताही वाद, मतभेद न होता शांततापूर्ण वातावरणात ही निवड पार पडल्याने पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी शहरातील ज्येष्ठ, अनुभवी तसेच युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सुरेश कांबळे, बाबासाहेब मोरे, आनंदा शिंगे,गणपती कोळी,अनिल केरीपाळे, राजगोंडा पाटील, तुकाराम पवार, रविंद्र केसरकर, उत्तम भोई, दिगंबर कदम, रमेश सुतार, कुलदीप कुंभार, जमीर पठाण आदी पत्रकारांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपस्थित पत्रकारांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष संतोष तारळे यांनी, पत्रकारांच्या विविध समस्या, मानधन, सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा तसेच पत्रकारांच्या व्यावसायिक अडचणी यासाठी संघाच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला. संघ अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी बनवण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष नागेश गायकवाड, सचिव उमेश माळगे व कार्याध्यक्ष संदीप अडसूळ यांनीही मनोगत व्यक्त करत संघाच्या कार्याला सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करून संघाच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बाबासाहेब मोरे यांनी पत्रकारांनी एकत्र राहून संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडावेत, पत्रकारितेची विश्वासार्हता जपावी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवावी, असे मार्गदर्शन केले.


