Home Uncategorized वाय. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एस. टी. साळुंखे यांची नियुक्तीशिक्षण वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

वाय. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. एस. टी. साळुंखे यांची नियुक्तीशिक्षण वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

4 second read
0
0
29

मलकापूर (प्रतिनिधी) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कुशल प्रशासक व दूरदृष्टी असलेले प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांची बदली पंढरपूर शाखेत झाल्याने बुधवार (ता. २४) पासून डॉ. साळुंखे यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. साळुंखे हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

यापूर्वी त्यांनी हडपसर (पुणे) येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात अल्पावधीत प्रभावी कार्य करत संस्थेला नॅक मूल्यांकनात ‘ए’ ग्रेड मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे विटा येथील बळवंत महाविद्यालय, रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय तसेच राजापूरसारख्या दुर्गम भागात त्यांनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

लॉकडाऊन काळात ऑनलाइन शिक्षण व कार्यालयीन कामकाज यशस्वीपणे राबवून त्यांनी आपल्या प्रशासन कौशल्याचे अभिलाषी दर्शन घडवले आहे. दहिवडी येथील महाविद्यालयात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दालनाची स्थापना, केंद्र शासनाच्या पीएम-उषा योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेणे, ३०५८ वृक्षांची लागवड तसेच मौजे ढोकमोडा (ता. माण) येथील ५० एकर पडीक जमीन वहिवाटीखाली आणून ती उपजाऊ करणे, अशी बहुपयोगी कामगिरी त्यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल म्हणून ओळख असलेल्या वाय. सी. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला त्यांच्या नियुक्तीमुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थीकेंद्री शिक्षण, गुणवत्ता वृद्धी, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर भर देत महाविद्यालय अधिक प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक-शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळात वाय. सी. महाविद्यालय गुणवत्तेचा मानदंड ठरेल, अशी सकारात्मक चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…