
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळकरांनी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखवत काँग्रेस, स्वाभिमानी व यादव गट यांच्या शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या हाती सत्ता सोपवली आहे. रविवारी पार पडलेल्या मतमोजणीत यादव पॅनेलने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून आणत एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती.
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडी, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील तसेच आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या ताराराणी आघाडीला यादव पॅनेलने दारुण पराभव स्वीकारायला लावला. आमदार यड्रावकर यांच्या आघाडीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले, तर आमदार अशोकराव माने यांच्या ताराराणी आघाडीला सून व मुलाच्या पराभवासह एकही जागा मिळवता आली नाही. नगराध्यक्ष पदासाठी यादव गटाच्या योगिता कांबळे यांनी तब्बल ५९४० मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.
आमदार यड्रावकर यांच्या आघाडीकडून माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवानी कांबळे आणि अमरसिंह शिंदे हे केवळ तीन उमेदवार विजयी झाले. तसेच श्वेता जाधव आणि शाहू कोळी या दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत तिन्ही आघाड्यांना आव्हान दिले. निकाल जाहीर होताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरभर जल्लोष केला. गुलालाची उधळण,फटाक्यांची आतषबाजी आणि डॉल्बीच्या तालावर तरुणांनी ठेका धरत विजयाचा आनंद साजरा केला. विजयी नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मात्र, पराभवामुळे राजर्षी शाहू विकास आघाडी आणि भाजप प्रणित ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरलेली दिसली.
दरम्यान, निकालानंतर यादव पॅनेलचे प्रमुख युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 0शिरोळ शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेत तीव्र नाराजी होती. पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभारासाठी शिरोळकरांनी यादव पॅनेलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. काही उमेदवार अल्पमताने पराभूत झाल्याचे दुःख असले तरी, निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांच्या सहकार्याने आणि जनतेच्या विश्वासावर शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


