
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ शहरात एवढ्या कोट्यावधी रुपयाचा विकास केला असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. पण त्या विकास निधीवर माझी स्वाक्षरी होती याचा त्यांना विसर पडला आहे.पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.पण त्यांचे विचार बदलले त्यामुळे विकासात डपला पाडण्याचा उद्योग सुरू झाला. अशा लोकांना बाजूला करण्याकरिता शिरोळकरांनी परिवर्तन घडवून शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानी विजयी करावे, असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. योगिता सतीश कांबळे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ शहरात जनसंवाद फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील बोलताना म्हणाले की, माजी खासदार राजू शेट्टी, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह समविचारी नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिव-शाहू प्रणित यादव पॅनेलच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. यादव पॅनेलचे सक्षम व कर्तबगार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि शहराच्या नागरी सुविधा देण्याबरोबरच महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासाठी कष्ट सहन करणाऱ्या महिलां स्वतःच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष करतात. पुरुषापेक्षा महिलामध्ये आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे शिरोळ नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर सौ. योगिता कांबळे यांनी महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा. या आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणारी तज्ञ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक व अन्य सुविधा आम्ही देण्यास तयार आहोत. शिरोळकर जनतेने विश्वासाने साथ दिली असून शिरोळच्या विकासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
गेल्या पाच वर्षात नगरपालिकेचा झालेला कारभार जनतेला रुचला नाही. यामुळे या ठिकाणी परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत यादव पॅनेलचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. योगिता सतीश कांबळे आणि नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, पृथ्वीराज यादव, अनिल यादव यासह यादव पॅनेलचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


