
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सौ.श्वेता विश्वास काळे प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांशी संवाद साधत आहेत.या भेटीदरम्यान शिरोळवासीयांनी गेल्या पंचवार्षिक काळातील झालेल्या १७९ कोटी रुपयांच्या विकासकामांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने त्या भारावून गेल्याचे त्या सांगतात. माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मंचावरून शिरोळकरांना दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा अभिप्राय मला प्रत्येक प्रभागातून मिळत आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी दिलेली संधी आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी दाखवलेला विश्वास मी नक्की पूर्ण करेन,अशी ग्वाही काळे यांनी व्यक्त केली.
गेल्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक दोघांनाही सोबत घेत विकासाचा मार्ग धरल्याने प्रत्येक प्रभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला.रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा अशा विविध कामांमध्ये नगरपरिषद प्रशासनाला उल्लेखनीय गती मिळाली.विकासासाठी मतभेद नव्हे तर सहकार्य महत्त्वाचे याचा आदर्श माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी घालून दिला. म्हणूनच आजही शिरोळकरांचा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे,असेही त्या म्हणाल्या.
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
आघाडीचे नगराध्यक्षपदासह सर्वच उमेदवार मतदारांशी प्रत्यक्ष भेटीत स्थानिक प्रश्न,केलेली कामे आणि आगामी विकास आराखडे याबाबत चर्चा करत आहेत. आघाडीच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत विकासाची भक्कम पायाभरणी घातली आहे. आता या कामांना पुढे नेणे आणि शिरोळला आधुनिक,स्वच्छ,सुरक्षित आणि सुजलाम-सुफलाम शहर बनवणे हेच आमचे ध्येय आहे, असे मत काळे यांनी व्यक्त केले.मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता आगामी मतदानात राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जनतेचा आशिर्वाद आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यांच्याबळावर आम्ही पुन्हा एकदा शिरोळच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत सौ.श्वेता विश्वास काळे यांनी जनतेशी संवाद साधत निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे.


