Home Uncategorized चंदगड नगरपंचायतीत राजकीय भूकंप…!राष्ट्रवादीचे दोन्ही गट ‘राजर्षी शाहू आघाडी’ म्हणून एकत्र..!

चंदगड नगरपंचायतीत राजकीय भूकंप…!राष्ट्रवादीचे दोन्ही गट ‘राजर्षी शाहू आघाडी’ म्हणून एकत्र..!

3 second read
0
1
147

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, ही निवडणूक ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाने लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर झाला. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर, रामराजे कुपेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
हसन मुश्रीफ यांनी या वेळी बोलताना, “पूर्वाश्रमीचे सहकारी पुन्हा एकत्र आलेत, हा आनंदाचा क्षण आहे. हे एकत्रीकरण केवळ निवडणुकीपुरते न राहता भविष्यातही कायम राहील अशी अपेक्षा आहे,” असे सांगत कार्यकर्त्यांना विजयासाठी एकदिलाने झटण्याचे आवाहन केले.
डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी सांगितले की, “पुरोगामी विचारांची एकत्र आलेली ही आघाडी चार दिवसांत उमेदवारांची घोषणा करेल आणि विकासाच्या ध्येयाने काम करेल.”
तर माजी आमदार राजेश पाटील यांनी स्पष्ट केले की, “आम्ही महायुतीचा घटक असलो तरी चंदगडचे भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे.”
आघाडी काँग्रेसविचारसरणीच्या इतर गटांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एकूणच, चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या नव्या आघाडीमुळे भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, चंदगडच्या निवडणुकीत आता खरी चुरस रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…