
कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि प्रचंड धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर या रस्त्याची पाहणी केली होती. लवकरात लवकर दर्जेदार रस्ता करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी नागरिकांना दिली होती.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या होत्या. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुरी देण्याचा आग्रह आमदार महाडिक यांनी धरला होता.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून १ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच हा निधी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग होऊन निविदा प्रक्रिया सुरू होईल. काही दिवसातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणारा हा रस्ता डांबरीकरणाचा मार्ग सुकर झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आमदार अमल महाडिक यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.