
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ व रविवार दि. ९ फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संयोजक ॲड. सतीश बोरुळकर उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ॲड. वामनराव चटप तर माजी आमदार सरोजताई काशीकर संमेलन अध्यक्ष असणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर शेतकरी नमनगीत होणार आहे..दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद होणार आहे. डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ.वसंतराव जुगळे, डॉ. जालंदर पाटील यांचा सहभाग आहे. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे आहेत.
तिसऱ्या सत्रात दुपारी गंगाधर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कवी संमेलन होणार आहे. याचे सूत्रसंचालन अजित सपकाळ व अनंत मुंडे करणार आहेत. या कवी संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या चौथ्या सत्रात ‘शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी ?’ या परिसंवादात शैलीजाताई देशपांडे, सीमा नरोडे, डॉ. आदिनाथ ताकटे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल घनवट उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर रावसाहेब पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजकुमार चौगुले, ज्ञानेश उगले सहभागी होणार आहेत. गंगाधर मुटे यांचे बीजभाषण होणार आहे.
रविवार दि. ९ वाजता शेतकरी भक्ती प्रभात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘शेतकरी गझल मुशायरा’ हा कार्यक्रम दिवाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यामध्ये राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. त्यानंतर परदेशी व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील यड्रावकर व शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश पाटील टाकवडेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत त्यांची उपस्थिती आहे.
दुपारी समारोपीय सत्रात अतिथी म्हणून सावकार मादनाईक, कैलास तवार, रमेश खांडेभराड हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा समारोप शेतकरी गर्जन गीताने समारोप होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


