शिरोळ : प्रतिनिधी
महाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणाऱ्या सरकारला घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे. राजकारणात विचारांना आणि तत्वांना खूप महत्त्व असते. पण ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, असे परस्पर विरोधी लोक एकत्र येऊन सरकार स्थापन करन महाराष्ट्राला अधोगती मध्ये नेण्याचे पाप त्रिकूट महायुतीच्या सरकारने केले आहे. देशाची आणि राज्याची प्रगती करण्यासाठी या महायुतीच्या त्रिकूट सरकारला घालवण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. स्व. सा. रे. पाटील यांनी समाजवादाचा पुरस्कार केला, कोणाला त्रास दिला नाही. अशा साहेबांचा वारसा स्वच्छ, निर्मळ मनाच्या आणि कमी बोलून जास्त काम करणाऱ्या गणपतराव पाटील यांनी चालविला आहे. ज्यांनी मतदारांना विचारात न घेता राजकारण केले, त्यांना त्यांच्या विचारापासून मतदार कसे लांब जातात हे दाखवण्याची वेळ आली असून गणपतराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील छ. शिवाजी महाराज तक्त येथे आयोजित जाहीर प्रचार ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बी. जी. माने होते. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले, विरोधकांनी तालुक्यात १९०३ कोटीची कामे केल्याचे दाखवावे, आम्ही जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहोत. ते म्हणतात आमच्याकडे सीडी आहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावे आम्हीही मतदार आहोत. आम्हाला कसले धमकावताय? आमच्याकडेही सीडी आहेत. पण आम्ही वैयक्तिक गोष्टीवर जाणार नाही. आमदारांनी सांगावे शिट्टीला मत म्हणजे शिंदे सरकारला मत, मोदी, शहा आणि फडणवीस यांना मत जाणार आहे का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
गणपतराव पाटील म्हणाले, येत्या दोन दिवसात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता जास्त आहे. पण हे लक्षात घ्या विरोधक खोटेनाटे सांगतील. सावध राहा. स्व. सा. रे. पाटील साहेबांच्या विचाराने काम करण्याची दृष्टी ठेवून त्या विचारावर मी चालत आहे. कोणत्याही चुकीला बळी पडू नका. सावध काम करा. शिरोळ तालुक्यामध्ये तंटे वाढू न देता सर्व समाजामध्ये सलोखा राखून माणूस हा एकच धर्म मानून पुढे जाण्याची आणि सर्वांचे जीवन सुखकर करण्याची माझी भूमिका आहे. शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.
यावेळी दलितमित्र शिवाजीराव परुळेकर, राजेंद्र प्रधान, डॉ. दगडू माने, दस्तगीर जमादार, अनिल खाडे, विक्रमसिंह जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. स्वागत प्रास्ताविक पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. गजानन संकपाळ यांनी आभार मानले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे चंगेजखान पठाण, मधुकर पाटील, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, अनिलराव यादव, दरगु गावडे, शेखर पाटील, मंजूर मिस्त्री, अरुणकुमार देसाई, धनाजी पाटील नरदेकर, पंडितराव काळे, तात्यासो पाटील, रावसाहेब भिलवडे,भवानीसिंह घोरपडे, हसन देसाई, स्वाती सासणे, गजानन पाटील, बापू चव्हाण, अनिरुद्ध कांबळे, गणेश पाखरे, फत्तेलाल मिस्त्री, दत्तात्रय कदम, डॉ. विकास पाटील, बापू गंगधर, विलास कांबळे, विनायक कदम, रघुनाथ देशिंगे, रामदास मधाळे, अर्चना संकपाळ, वरूण पाटील, मिनाज जमादार, कविता चौगुले, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, सतीश भंडारे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, अभिजित पवार यांच्यासह शिरोळ शहर व उपनगरातील मतदार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.