शिरोळ : प्रतिनिधी
महायुती फसव्या सरकारला जागा दाखविण्यासाठीची ही निवडणूक आहे. महायुतीचे, अविश्वासाचे सरकार की महा विकास आघाडीचे विश्वासाचे सरकार सत्तेत आणायचे याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. मताचे विभाजन करून सत्तेची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न महायुती करत असून तांदळातील खड्याप्रमाणे या सरकारला बाजूला करावे लागेल. विकासाचा हा रथ शिरोळ तालुक्यातून पुढे जाईल, त्यासाठी गणपतराव पाटील यांच्या रूपाने विकासात्मक आणि सुसंस्कृत नेतृत्व जोपासावे लागेल. जनतेचे अश्रू पुसण्यासाठी मविआला निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित मविआच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. शिरोळ मध्ये छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जयसिंगपूर येथे क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी मी व गणपतराव पाटील घेत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
कॉ. धनाजी गुरव म्हणाले, संविधानाने जे मिळवले ते नष्ट करण्याची भूमिका घेऊन महायुती काम करत आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपा बरोबर गेलेल्या उमेदवारांना मते मागताना लाजही वाटत नाही. या सर्वांना गरिबांच्या चुली पेटवायच्या नाहीत, पण माणसे कशी पेटवायची हे यांना माहित आहे. त्यामुळे आगामी काळात मनुस्मृती आणून संविधान नष्ट करू इच्छिणाऱ्या भाजपा महायुतीला हद्दपार करा..ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले, तालुक्यात दोन नंबर वाल्यांचे जाळे पसरवले असून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम होत आहे. विरोधी आमदाराला भगवा चालत नाही. भाजपाचा झेंडा घ्यायला का लाज वाटते? त्यांचा पाठिंबा कसा चालतो? त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठीच झेंडे न घेता अपक्ष लढवित आहेत. आजच्या गर्दीने गणपतराव पाटील आमदार होणार हे निश्चित झाले आहे.
माजी जि. प. समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळाले ल्या पंधराशे रुपये वरून महिलांना धमकी देणाऱ्या खासदार आणि महायुती सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीला महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.
गणपतराव पाटील म्हणाले, तालुक्यातील महापूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, जमीन क्षारपड मुक्ती, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, औद्योगिक वसाहतीची निर्मिती अशा विविध माध्यमातून तालुक्याचा विकास करण्याची माझी दृष्टी आहे. तालुक्यात सलोखा जोपासणे, एकोपा निर्माण करणे शांततेतून विकास साधण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. हात या चिन्हासमोरील 1 नंबरचे बटण दाबून मला काम करण्याची मला संधी द्या. माजी आमदार राजीव आवळे, महादेवराव धनवडे, मंगलाताई चव्हाण, जीवन बरगे, माधुरी सावगावे, कु. बुशिरा खोंदू, वेदिका भुजुगडे, अमन पटेल आदींनी गणपतराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साहिल शेख यांनी केले. आभार शाहीर आवळे यांनी मानले.
काँग्रेसचे निरीक्षक साके शैलजानाथ, राहुल खंजिरे, भवानीसिंह घोरपडे, अनिलराव यादव, पृथ्वीराजसिंह यादव, चंगेजखान पठाण, जयराम बापू पाटील, बी. के. पाटील, श्रीमती विनया घोरपडे, मधुकर पाटील, विक्रमसिंह जगदाळे, रणजित कदम, अरुणकुमार देसाई, शरदचंद्र पाठक, सर्जेराव शिंदे, मुसा डांगे, हसन देसाई, धनाजी पाटील नरदेकर, गुंडाप्पा पवार, रमेश शिंदे, युनूस डांगे, संजय अणुसे, विजय पाटील, बाळासाहेब सावगावे, प्रफुल्ल पाटील, विलास कांबळे, बाबासाहेब नदाफ, तानाजी आलासे, सागर धनवडे, शंकर पाटील, मिनाज जमादार, स्नेहा देसाई, कविता चौगुले, वसंतराव देसाई, बंटी जगदाळे, गणेश पाखरे, संदीप पाटील, यांच्यासह मविआ व मित्र पक्षांमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिरोळ विधानसभा मतदार संघातील महिला व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.