टिम वर्ल्ड फॉर नेचर उपक्रम
नमस्कार मित्रांनो,
थोडा वेळ काढून खालील प्रश्न वाचूया,
● मेलेल्या सापाच्या सांगाड्यावर चुकून आपला पाय पडला तर आपल्याला विष चढते का?
● नागाला मारल्यावर नागीण बदला घ्यायला का येते?
● साप चावल्यावर माणसाला वाचवायला आपल्याकडे किती वेळ असतो?
● साप चावल्यावर चावलेल्या ठिकाणी ब्लेड मारले तर चालेल काय?
● साप चावल्यावर देवळात ठेवल्यावर माणूस लगेच कसा काय बरा होतो?
● अँटीस्नेक व्हेनम म्हणजे काय व ते कसे बनवतात?
● प्रत्येक साप चावल्यावर वेगळे औषध लागते का ?
● सापाला ऐकू येते का? मग नाग पुंगीवर का डोलतो?
● काहीजणांच्या शेतात केसांचा नाग कसा काय असतो?
● जमिनीत पुरलेल्या सोन्याच्या हंड्यामध्ये आत नाग कसे काय राहतो?

हे सर्व प्रश्न, शंका, कुतुहुल कोणाचे आहेत तर शाळकरी विद्यार्थ्यांचे. वरील प्रश्न नीट वाचले तर नक्कीच कळेल की शाळेच्या मुलांना ( व पालकांना देखील) सापांच्याबद्दल भरपूर कुतूहल आहे, भरपूर गैरसमज आहे, भरपूर अंधश्रद्धा आहेत आणी या सर्व प्रश्नांचे शंका निरसन करून त्यांना सापांच्याबद्दल असणारे अज्ञान, भीती दूर करणे यासाठीच सर्पजनजागृती कार्यशाळा महत्वाची आहे.
यासाठीच वर्ल्ड फॉर नेचरने ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांच्यावर सर्प जनजागृती अभियान सुरू केले आहे. कारण अशा ठिकाणी शहराच्या मानाने सापांचा अधिवास जास्त असतो व सर्पदंश होण्याचे प्रमाणही तितकेच जास्त असते. त्यामुळे कोणताही साप दिसला की त्याला मारायचे हे ठरलेले समीकरण आहे.

मग भीतीपोटी सापाला मारले जाते. त्याला मारले नाही आणी तसेच सोडून दिले तर तो पुन्हा घरात, आसपास येऊ शकतो हा येथे सर्वांचा तर्क आहे. तसेच या भागात सर्पदंश झाला तर प्रथमोपचार तर दूरच प्राथमिक आरोग्य केंद्र ४० – ५० किलोमीटर दूरवर आहे. गावात, वाड्या वस्त्यांवर कोणतेही डॉक्टर नसतात, मेडिकल ही नसते मग सर्पदंश झालेली व्यक्ती फक्त वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दगावते. मग अशावेळी घरचा कर्ता व्यक्ती दगावला तर पूर्ण घर कोसळते.
यासाठीच ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांवर सर्पजनजागृती शाळा गरजेची आहे. त्यामुळेच वर्ल्ड फॉर नेचरतर्फे व दुर्ग शिलेदार ग्रुपच्या वतीने, जवाहर हायस्कूल निळपण, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर या शाळेत १५० विद्यार्थ्यांसाठी “सर्प जनजागृती कार्यशाळा” घेण्यात आली. प्रचंड उत्साहात या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम राबविण्यासाठी जवाहर हायस्कूल निळपण, तालुका भुदरगड शाळेचे मुख्याध्यापक एन एस सारंग, डी एस पाटील, डी बी कदम, मनोज देसाई, एस बी पाटील, वाय पी पाटील, देसाई मॅडम व कोराणे मॅडम यांचे सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिजीत वाघमोडे, रामानंद गावडे, राहुल काणेकर, श्रेयस शेट्टी तसेच दुर्ग शिलेदार ग्रुपचे आनंद देसाई,साताप्पा गुरव, दत्तात्रय गवसे, साईश गुरव उपस्थित होते.
पावसाळयात साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी व पूर्ण माहितीशिवाय कोणत्याही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये व साप चावल्यावर अघोरी उपाय करण्यात वेळ न दवडता त्वरित सरकारी दवाखान्यात दाखल होऊन पुढील उपचार घ्यावेत असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर टीमने केले आहे.


