१७ एप्रिल २०२४
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ चा आज निकाल जाहीर झाला.कोल्हापूर जिल्यातील तिघांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. कोल्हापुरातील फरहान जमादार, आजार तालुक्यातील उत्तूरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव लौकीक वाढवले .

फरहान जमादार १९१ रँक
कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील फरहान जमादार यांनी १९१ रँक मिळवत उज्वल यश संपादन केले. त्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कुल येथे झाले.विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी तर सांगलीतील वालचंद कॉलेजमधून कॉम्पुटर सायन्समधून इंजिनीयरची पदवी घेतली.
उत्तूरच्या वृषालीचे अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यश
उत्तूर गावची सुकन्या वृषाली संतराम कांबळे यांनी २३ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यश मिळविले. त्यांना ३१० वा क्रमांक मिळाला. आजरा, चंदगड, गडहिंग्लज उपविभागातील त्या पहिल्या आयएएस ठरल्या आहेत. त्यांच्या यशाने उतूर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आशिष पाटील यांची सलग तिसऱ्या वर्षी यशाला गवसणी
साळशीतील आशिष पाटील हे सध्या राजस्थान केडरमध्ये आयपीएस म्हणून रुजू आहेत. त्यांनी २०२१ मध्ये याच परीक्षेत ५६३, २०२२ मध्ये ४६३ तर आज १४७ वी गुणवत्ता प्राप्त केली. त्यांचे वडील अशोक पाटील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिरवाडी येथे झाले. ते चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरे आले होते. सुपात्रे येथील दि न्यू इंग्लिश स्कूल येथे पाचवी ते सातवी तर आठवी ते दहावीचे शिक्षण महात्मा गांधी उच्च व माध्यमिक विद्यालय (बांबवडे) येथे पूर्ण केले.


