
कोल्हापूर – इलेक्ट्रिक कृषी पंपांची चोरी करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून सहा इलेक्ट्रिक पंप, एक चार चाकी आणि छोटा टेम्पो असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ग्रामीण भागातील इलेक्ट्रिक कृषी पंपाची चोरी करणारे तिघे सराईत चोरटे आज चोरी केलेल्या कृषी पंपांची विक्री करण्यासाठी कोल्हापुरात येत असल्याची माहिती जुना राजवाड्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानूसार संभाजीनगर इथं संशयास्पद आलेल्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीच्या उद्देशानं विक्री करण्याकरिता आणलेल्या 6 कृषी पंप पोलिसांना आढळून आले. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या एका कॅनॉलवरुन या कृषी पंपांची चोरी केल्याची कबुली या संशयित आरोपींनी दिली. या प्रकरणी अनिकेत शिंदे, शुभम चौगले आणि प्रथमेश मांडवकर या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
केके न्यू साठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे


