रायपूर गावातून 17 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या भूषण जयराम तळेले (वय 34) यांचा खून झाल्याचे बुधवारी समोर आले.भूषण यांचा खूनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.17 एप्रिल रोजीच त्यांचा खून केल्याची कबुली अटकेत असलेल्या भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी दिली.
घटना अशी की, भूषणची व भिकन यांची एकमेकांशी मैत्री होती. यातून त्यांच्या कुटुंबियांशीही ओळख झाली. याच ओळखीतून भूषण आणि भिकन यांचे काही कारणामुळे मतभेद झाले. चटईच्या कंपनीत काम करणाऱ्या भूषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करून भिकन व विठ्ठल हे दोघे 17 एप्रिल रोजी भुसावळला घेऊन गेले. तेथे तीघे जण दारू प्यायले. यानंतर पुढे मुक्ताईनगर येथे जाऊन पुन्हा दारू पिली. दुपारी चार वाजेच्या सुमारास ते नेपानगर परिसरातील एका जंगलात पोहोचले होते. या ठिकाणी दोघांनी भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली. दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.
भूषणचा मृत्यू झाल्यानंतर दोघांनी त्याला शेजारीच असलेल्या एका नाल्यात पुरले. माती, दगड टाकून त्याचा मृतदेह पुरल्यानंतर दोघेजण भुषणची दुचाकी घेऊन पुन्हा रायपूर येथे आले. यानंतर दोघेही सामान्यपणे वागत होते. यानंतर भिकन भूषणच्या कुटुंबियांना फोन करुन भूषणला पुण्यात, गुजरात, भुसावळ येथे पाहिल्याचे सांगत राहिला. बरेच दिवस झाले तरी पती परत न आल्यामुळे आशा यांनी पोलिसांना गळ घातली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, गफुर तडवी, सिद्धेश्वर डापकर, सुधीर साळवे यांच्या पथकाने भिकन व विठ्ठल यांचा चौकशीसाठी बोलावून घेतले.