कोल्हापूर: गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला एएस ट्रेडर्सचा संचालक अमित अरुण शिंदेला पोलिसांनी पकडले आहे. गुरुवारी (दि. १७ ऑगस्ट ) सकाळी अमितला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्या पथकाने अटक केली.
कमी वेळेत मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे ३००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालकावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील विक्रम जोतीराम नाळे, बाबासो भूपाल धनगर, बाळासो कृष्णात धनगर व सुवर्णा श्रीरंग सरनाईक यांना पोलिसांनी अटक केली होती.
सध्या या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमित शिंदेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी शहरातून अटक केली. अमित शिंदे कंपनीचा संचालक असून गुंतवणूक वाढवण्यात याची महत्त्वाची भूमिका होती. त्याला आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे माहिती हाती लागतील, असा विश्वास तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.