राजकीय सत्ता ही सर्व समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्य जातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान हे न विसरण्यासारखेच आहे. महिला, कामगार, शेतकरी व दुर्लक्षित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष असे कार्य केले आहे. संविधान हे एक महत्त्वपूर्ण सामाजिक दस्तावेज आहे. संविधानातूनच समाजाला ऊर्जा मिळू शकते. संविधानामुळेच राष्ट्रीय ऐक्य अबाधित आहे असे प्रतिपादन श्री अण्णासाहेब डांगे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हातकलंगले येथील मराठीचे प्राध्यापक तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले.

मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात बी.सी. सेल विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर विशेष व्याख्यानात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप हे होते यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नामदेव आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन ग्रंथपाल बी. एस. चिखलीकर यांनी भरविले होते .तसेच कार्यक्रमाचे निमित्त साधून निबंध स्पर्धा ही सदर वेळी घेण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बी.सी. सेल विभाग व समान संधी केंद्र विभागाचे प्रमुख व भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. के. आर. खरात यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ.अमोल कांबळे यांनी करून दिला यावेळी सूत्रसंचालन प्रा.प्रमोद नाईक यांनी केले तर आभार मराठी विभागाचे प्रा.डॉ. बी.ए. सुतार यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होता.


