
महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी ‘अंगणवाडी दत्तक’ योजना राबविली जात आहे.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था, उद्योगपती पुढे येत आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी ’15 अंगणवाड्या’ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यामध्ये आणि महिला व बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार पार पडला आहे.

15 अंगणवाडी दत्तक घेतल्यानंतर याचा भौतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधांसाठी येणारा सर्व खर्च विश्वराज महाडिक आणि भागीरथी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचा आदर्श व विकासात्मक कायापालट होणार आहे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत. एका अंगणाडीला स्मार्ट बनवण्यासाठी 3-5 लक्ष रुपये खर्च येणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
