Home Uncategorized करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

3 second read
0
0
35

करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक प्रलंबित आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी सातत्याने पाठपुरावा करत मांडलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आरोग्य भवन , मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील विविध समस्या, आवश्यक सुविधा, रिक्त पदे आणि नवीन इमारतींच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक रुग्णालयीन इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच गगनबावडा येथे तात्काळ डेंटल चेअर, डेंटिस्ट व डेंटिस्ट असिस्टंट उपलब्ध करून दंतसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आवश्यक औषधे व वैद्यकीय साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

खुपीरे ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस युनिट सुरू करण्याच्या मागणीला बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्यासाठी आवश्यक इमारतीचा प्रस्ताव डीपीडीसीमार्फत सादर करण्यात येणार आहे. तसेच खुपीरे येथे डेंटल चेअर उपलब्ध करून दंतसेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोपार्डे व कोगे येथे नवीन रुग्णालयीन इमारती उभारण्यासाठी आवश्यक निधी १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. भुये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जीर्ण इमारत निर्लेखन करून नवीन इमारत उभारण्यासाठी डीपीडीसीमधून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

तसेच कोलिक, सडोली खालसा, वाशी व कुरुकली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन इमारती उभारण्याकरिता आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून घेण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

करवीर मतदारसंघातील ग्रामीण नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार चंद्रदीप नरके सातत्याने पाठपुरावा करत असून त्यांच्या मागण्यांना शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव श्री. ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, आयुक्त (शहरी) डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड (पुणे), सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, सहसंचालक श्री. भालेराव, विशेष कार्य अधिकारी डॉ. शिवदास, सहसंचालक डॉ. हजारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे (कोल्हापूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात तसेच जिल्हा कार्यक्रम सहाय्यक श्री. अभिजीत हासूरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

कोल्हापूरमधील सेव्हंथ डे हायर सेकंडरी स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम …