Home Uncategorized करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

4 second read
0
0
13

करवीर मतदारसंघातून प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर–गोवा) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या तीव्र विरोधाची दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना ठामपणे मांडत प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केली.

सदर प्रस्तावित महामार्ग करवीर विधानसभा मतदारसंघातील केर्ली, केर्ले, पाडळी बुद्रुक, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला या १८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावातील मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनींचे अधिग्रहण होण्याची शक्यता आहे. या भागातील शेती ही ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन, केळी यांसारख्या नगदी पिकांवर आधारित असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लहान-लहान तुकड्यांत विभागलेल्या जमिनींमुळे शेती करणे अशक्य होईल आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय, या महामार्गामुळे स्थानिक जलस्रोत, नाले व नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण परिस्थिती लक्षात घेता हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असल्याचेही आमदार नरके यांनी अधोरेखित केले.

महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पाविरोधात करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसभांद्वारे ठराव मंजूर करण्यात आले असून, शेतकरी व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय विषय नसून व्यापक जनभावनेशी निगडित प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार नरके यांनी निवेदनात नमूद केले की, विद्यमान राष्ट्रीय महामार्ग व इतर पर्यायी मार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर महामार्ग उभारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हा प्रकल्प करवीर मतदारसंघातून न नेता पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

या सर्व बाबींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विषय गांभीर्याने ऐकून घेतला आणि शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

करवीर मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या हक्कांसाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात असून, आता शासन स्तरावर या प्रकल्पात बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

पन्हाळा : प्रतिनिधी सचिन वरेकरपन्हाळा तालुक्यातील माजगाव येथील विद्यामंदिर आकुर्डेचे मुख्य…