
कुरुंदवाड : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये रविवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेमुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असलेल्या या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पदयात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. शहराच्या विविध भागांतून निघालेली ही प्रचार फेरी ‘शिट्टी’च्या आवाजाने गजबजून गेली.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक या पदयात्रेत सहभागी झाले होते. काळाराम मंदिर परिसरातून सुरुवात झालेल्या या रॅलीने गोठणपूर विभाग, मुख्य बाजारपेठ, तसेच शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरून भव्य प्रर्दशन केले. पदयात्रेत महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता.

या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या काही काळात केलेल्या विकासकामांचा आढावा नागरिकांना दिला. शहरातील रस्ते-विस्तारीकरण, भुयारी गटार योजना, नळ पाणी योजना, आरोग्य सुविधा, क्रीडा संकुल, तसेच विविध मूलभूत सुविधा उभारण्यासंदर्भातील कामांची माहिती त्यांनी थोडक्यात मांडली. विकास कामांची दखल घेत शहरातील नागरिकांनी पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे स्वागत केले. नागरिकांनी पुढील काळातही याच पद्धतीने विकासकामे सुरू राहावीत म्हणून राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिला. काही ठिकाणी व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी आमदार यड्रावकर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून त्यांचे आभार मानले.
निवडणुकीला एकच दिवस उरलेला असताना राजर्षी शाहू विकास आघाडीने कुरुंदवाडमध्ये आपली ताकद दाखवून काढलेल्या पदयात्रेमुळे प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी नागरिकांशी संवाद साधताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला संकल्प मांडला. महिलांच्या सुरक्षेपासून ते पाणीपुरवठा, स्वच्छता, शहरसौंदर्य आणि युवकांसाठी रोजगारविषयक उपक्रम राबवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.
पदयात्रेच्या दरम्यान उमेदवारांसोबत संवाद साधताना नागरिकांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सहभागी झाल्याने वातावरण अधिक जोमदार झाले. शहराच्या मुख्य मार्गावर पदयात्रा पोहोचताच शिट्ट्या आणि हलगीच्या कडाडाने व जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या पदयात्रेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. एकूणच या आघाडीच्या शक्तीप्रदर्शनामुळे शाहू आघाडीचा जोर मात्र आणखीन वाढला आहे. या पदयात्रेत राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


