
भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांचा भाजप प्रवेश झाला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी दि. २ रोजी झालेल्या कार्यक्रमात सावकार मदनाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही विधानभवनात मादनाईक यांचे स्वागत केले.
नूतन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मादनाईक यांचा पहिलाच भाजप प्रवेश झाला. खासदार धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक-निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष महेश देवताळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे, जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके, विजय माणगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाणा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री मादनाईक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. भाजप त्यांना भविष्यात पाठबळ देण्याची भूमिका घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रवेशानंतर सत्काराला उत्तर देताना श्री मादनाईक म्हणाले, गेली पंचवीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार आहे. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


