
शिरोळ : प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे या उंचीवाढीच्या विरोधात आज रविवार, १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत असून, सर्वांचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास शिरोळ तालुक्याला पुन्हा गंभीर पूरस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९. ६० मीटर (१७०४ फूट) इतकी आहे. कर्नाटक सरकारने ही उंची ५२४.२६ मीटर (१७२० फूट) पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे. म्हणजेच सुमारे १५ फूट उंचीवाढ होणार आहे. धरणाची जलसाठवण क्षमता वाढल्याने अधिक काळ पाणी रोखले जाणार असून, मुसळधार पावसाच्या वेळी अचानक अधिक पाणी सोडल्यास महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांना प्रचंड फटका बसू शकतो. शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ आणि २०२४ या वर्षांमध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. गावांचे पुनर्वसन, शेतीचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सर्व समस्यांनी तालुक्याला ग्रासले आहे. या पूरस्थितीमागे अलमट्टी धरणातील पाण्याचे अयोग्य नियोजन हे महत्त्वाचे कारण आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय संघर्ष समितीने चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. धरणाच्या उंचीवाढीचा थेट फटका शिरोळ तालुक्याला बसणार आहे, पूरग्रस्तांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असून, तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी दौरे सुरू आहेत.
रविवारी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.