मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते:
कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील दिनकर शंकर माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे पुत्र संग्राम व सागर माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना वृक्षांचे वाटप करून वडिलांच्या स्मृतीला अनोखी मानवंदना दिली.

दिनकर माने यांचे एक वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते. उपचारासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. आपल्या व्यवसायातील आधारवड, मार्गदर्शक वडिलांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन झाल्यामुळे त्यांच्या आठवणी चिरकाल जपण्यासाठी माने बंधूंनी पारंपरिक खर्च टाळत वृक्षवाटपाचा सामाजिक उपक्रम राबवला.

या उपक्रमास मलकापूर नगर परिषदेचे आघाडी प्रमुख प्रकाश पाटील, उदय साखरचे संचालक अमित पाटील, तसेच माने कुटुंबातील सदस्य व गावकरी उपस्थित होते. यावेळी भजनसेवेचेही आयोजन करण्यात आले होते.

संग्राम व सागर माने म्हणाले, “वडिलांनी आम्हाला दिलेली शिकवण आणि मूल्यांची शिकवण हीच आमच्यासाठी खरी संपत्ती आहे. त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात आणि त्यांच्या विचारांचे स्मरण होते राहावे, यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला.”