
जयसिंगपूर : प्रतिनिधी
मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा जोरदारपणे मांडला. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, जलद गतीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यांच्या या मुद्द्याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत पंचगंगेच्या प्रदूषणावर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेची सांडपाणी व औद्योगिक प्रोसेस युनिटचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत असल्याने पंचगंगेच्या पाण्याचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न वाढत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना देखील दूषित पाण्यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आमदार यड्रावकर यांनी पंचगंगेच्या प्रदूषणाबाबत मुद्दा उपस्थित केला. पंचगंगा ही लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. मात्र, प्रदूषणामुळे ती दूषित होत आहे. त्यामुळे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्याची गरज आहे.
आमदार यड्रावकर यांच्या मागणीमुळे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आणि ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा होणार आहे. ७ मार्चच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार आहेत. आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


