
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर आरोग्य अभियान, जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २७५० पेक्षा अधिक महिलांनी तपासणी करुन घेतले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव (इचलकरंजी) येथे झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते.
यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, ‘महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलेचे आरोग्य निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी. त्यांनी आपले शारिरीक व मानसिक आरोग्य सांभाळावे. जैन महिला परिषद आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून तपासणी व त्यानंतरचे उपचार होणार आहेत. सभेने प्रत्येकवर्षी प्रत्येक विभागात असे शिबिर आयोजित करुन महिलांचे आरोग्य सक्षम करावे.’

यावेळी अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले, ‘प्रत्येक वर्षी सांगली, कोल्हापूर व कर्नाटक विभागात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येईल. त्याचा खूप मोठा फायदा सर्वच महिलांना होईल. सभेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु. सभा आता पंचकल्याण पूजेतून काही रक्कम देणगी रुपातून घेवून गरजू विद्यार्थ्यांना दत्तक-पालक योजनेतून शिष्यवृत्ती देत आहे. यासाठी संपूर्ण जैन समाज, मुनीवृंद, पंचकल्याणक समिती यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.’
यावेळी स्वागत व प्रास्ताविक जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ. स्वरुपा पाटील यड्रावकर यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता मगदूम यांनी केले. आभार कर्मवीर आरोग्य अभियानाचे डॉ. देवपाल बरगाले यांनी मानले. यावेळी गावा-गावातून बसमधून महिला तपासणीसाठी आल्या होत्या. यावेळी मेडिसिन, स्त्रिरोग, अस्थीरोग, शस्त्रक्रिया, नेत्ररोग, कान-नाक-घसा, रक्त, क्षयरोग अशा विविध तपासणी व आयुर्वेद, होमीपॅथी उपचाराची सुविधा शिबिरात करण्यात आली होती.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, खजिनदार संजय शेटे, ट्रस्टी राजेंद्र झेले, ट्रस्टी अनिल बागणे, महामंत्री दादासाहेब पाटील-चिचंवाडकर, सौ. विजया पाटील, सौ. सुरेखा पाटील, आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील, आयजीएमच्या डॉ. भाग्यरेखा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा, जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ, शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक-सेवक, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकिय आरोग्य केंद्र व शासकिय योजना उपलब्ध असणारे रुग्णालये व त्याचा स्टाफ उपस्थीत होते.


