शिरोळ : प्रतिनिधी
दक्षिण भारत जैन सभा संस्कार, शिक्षण, आरोग्य ह्या त्रिसुत्रीवर काम करीत आहे. सध्यस्थीतीला समजातील नवीन पिढीला दिशा देण्याची आवश्यकता आहे. समाजातील शेती गुंठ्यावर आली असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व पाठबळ देण्यासाठी सभा काम करील. भविष्यातील समाजाच्या मूलभूत गरजा ओळखून आपण सर्वजण काम करुया. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभेचे काम पोहचविणे हे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ते उदगांव येथे दक्षिण भारत जैन सभेच्या आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. आमदार यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ सदस्य रावसाहेब पाटील यांचा सन्मान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भालचंद्र पाटील होते.
भालचंद्र पाटील म्हणाले, समाजासमोरील प्रश्न वेगळे आहेत. समाजातील मुले शिकले पाहिजेत म्हणून दत्तक पालक योजना सुरु केली आहे. मुलांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सभा करेल. अशा अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी फंड उभा केला असून तो आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नात आहे. यामधून समाजासाठी भरीव काम करण्याचा आम्ही मानस ठेवूव वाटचाल करीत आहोत.
आमदार आवाडे म्हणाले, जैन समाजातील मुलांनी गावाचे वेस सोडायचे धाडस करायला हवे. तरच समाजाची प्रगती होईल. परिसरातील जैन समाज उत्कृष्ट शेती करतो, तसा उच्च शिक्षित व उद्योजक बनावा यासाठी शिक्षण मंदीरे उभारले पाहिजेत. समाजाला ज्यावेळी गरज भासेल तिथे मी समाजाच्या सोबत आहे.
रावसाहेब पाटील म्हणाले, समाजातील गरीब मुलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याच्या अल्पसंख्यांक महामंडळ काम करेल. त्याच्या माध्यमातून राज्यातील जैन समाजासाठी काम करण्यात येईल. यावेळी अरविंद मजलेकर, सागर चौगुले, प्रा. आण्णासाहेब क्वाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाची सुरवात णमोकार महामंत्राने सुरु झाली. दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे यांचा त्यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेबद्दल सन्मान केला. स्वागत संजय शेटे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र झेले यांनी केले.
यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे शांतिनाथ कांते, सुहास पाटील, सावकर मादनाईक, अनिल बागणे, भूपाल गिरमल, शशिकांत राजोबा, डॉ. महावीर अक्कोळे, शांतिनाथ नंदगावे, कमल मिणचे, विजया पाटील, बबव थोटे, स्वरुपा पाटील यड्रावकर, दिलिप वग्याणी, डी.ए. पाटील, एस. पी. मगदूम, सभेचे पदाधिकारी, गावांगावातील मंदीर कमिटीचे पदाधिकारी, श्रावक-श्राविका उपस्थीत होते. सूत्रसंचालन एन.डी. बिरनाळे यांनी केले. आभार दादा पाटील चिंचवाडकर यांनी मानले.